घातकी मित्र

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

घातकी मित्र –

जाणीवपूर्वक आपल्याला टाळणारी व्यक्ती घातकी मित्र कितीही जवळची असली, तरी ती शत्रुपेक्षा जास्त घातक असते. आपण ज्यांना जवळचे समजतो, त्याच व्यक्तीच्या आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपण ज्यांना जवळचे समजतो त्यांच्या मनात आपल्याबद्दल किती जवळीक आहे ? हे प्रसंगावरून आणि अनुभवावरून समजते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

आपण ज्यांना जवळचे समजतो, त्यांच्यावर आपला विश्वास असतो, परंतु ही जवळची वाटणारी माणसे कधीकधी विरंगुळा म्हणून  आपला वापर करत असतात. त्यांना आपण टाईमपास म्हणून हवे असतो, हे आपल्याला लवकर समजत नाही. कधीकधी त्यांना आपली गरज असते, त्या काळापुरते ती आपल्याला जवळ करतात.

आपले अंतःकरण प्रेमळ आणि उदार असेल, तर आपल्याला सगळीच माणसे जवळची वाटतात. हा दैवी गुण आहे, यात गैर काहीच नाही, परंतु अशा माणसांनी अखंड सावधान असले पाहिजे. ज्यांच्यावर विश्वास टाकला, ती माणसे विश्वासास पात्र नसतील, तर आपले प्रचंड नुकसान करू शकतात, जे कशानेही भरून येऊ शकत नाही कारण ही माणसे आपला विश्वासघात करत असतात.

आपल्या चुकीमुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे किंवा अपुऱ्या क्षमतेमुळे आपल्या जीवनात येणारा तोटा, हा सहन करण्यासारखा असतो कारण त्याला आपण स्वतः जबाबदार असतो, परंतु विश्वासघातामुळे होणारा तोटा आपल्याला सहन करण्याच्या पलिकडे असतो कारण याची मानसिक तयारी आपण कधी केलेली नसते. जो विश्वासघात करतो त्याच्या हातात या तोट्याचे माप असते, म्हणून आपल्या शत्रूपेक्षा हा जास्त घातक असतो.

पद, प्रतिष्ठा, वैभव, गर्व, अहंकार, घमेंड या गोष्टी माणसाला जवळच्या माणसापासून खुप दूर घेउन जातात. अशा गोष्टी धारण करणारी माणसे कायम आपल्या तोऱ्यात आणि घमेंडीत असतात. ही कधीच कोणाचे खरे मित्र नसतात, यांना फक्त स्तुती करणारे भाट हवे असतात आणि अशा भाटांचा शोध ते नेहमी जवळच्या माणसात शोधतात. मग त्यातून पहिला क्रम मित्राचा लागतो, हा खरेतर मैत्री आणि मित्रत्व याचा अंत्यविधी असतो.

आपल्याला जाणीवपूर्वक टाळणाऱ्या आणि आपला फक्त वापर करणाऱ्या गोडबोल्या मित्रापासून शत्रुपेक्षा जास्त कायम सावध असावे.

शत्रु समोरून वार करतो परंतु असा घातकी मित्र नेहमी पाठीमागून वार करतो आणि तो आपल्यासाठी निर्णायक असतो. अशा घातकी मित्रांनी अनेक चांगल्या माणसांचा घात केल्याचा इतिहास आहे. देशासाठी लढणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा ठावठिकाणा चार पैशासाठी अशा घातकी मित्रांनीच इंग्रजांना दिलेला आहे.

राजे शहाजी जिंजीला वेढा देऊन प्राणपणाने लढत होते. जवळचा मित्र असलेला आदिलशाहीतील सरदार खान मोहम्मद खान यांनीच बाजी घोरपडे करावी शहाजी राजांना कैद केले होते.

इतिहास साक्षी आहे, मित्र खरा असला तर आपल्यासाठी स्वतःचा प्राणही देऊ शकतो आणि मित्र खोटा व नाटकी असला तर आपला जीवही घेऊ शकतो.

आयुष्यात मित्र कमी असले तरी चालतील, अगदी एक असला तरी चालेल, पण तो खरा असावा. हा सुद्धा नशिबाचाच भाग आहे .

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment