गुपित

By Bhampak Story Sameer Khan 20 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

गुपित –

( माझ्या कथा नेहमीच वेगळ्या धाटणीचा असतात. “पैंजण, बोन्साय, पाकिजा ते श्रीकृष्णावरची पोस्ट.. वाचकांनी मला भरभरून कौतुक, प्रेम दिलंय. याबद्दल खुप आभार सदर कथाही अत्यंत वेगळ्या विषयावर असून वाचकांना या कथेमागील शुद्ध भाव नक्कीच समजेल. हा लेख कुठल्याही धर्म, समुदाय, व्यक्ती यांचा अनादर करणारा नाहीये तसं वाटल्यास आधीच क्षमस्व. मात्र कथा आवडल्यास आपले प्रांजळ मत नक्कीच व्यक्त करावे. धन्यवाद।)

अप्पासाहेब अस्वस्थपणे बाहेर येरझर्या घालत होते. प्रसंगच तसा होता. त्यांची बायको लक्ष्मी तिसर्‍यांदा गर्भाने होती. दोन बाळंतपण सुखरूप झालेले असले तरी तिसर्‍या गर्भासाठी शरीर तयार नव्हते. वैद्याने आधीच कल्पना दिलेली होती. दोन दिवसांपासून भयंकर त्रास झेलत व शेजारच्या गावातून जाणत्या सुईणीला आणूनही लक्ष्मी बाळंत होत नव्हती. लक्ष्मी माई म्हणूनच सर्वत्र परिचित होती. तशी बैलगाडी तयार करून ठेवली होती तालुक्यातील दवाखान्यात नेण्यासाठी मात्र बाळ बाळंतिन दोन्हींच्या जीवाला धोका होता म्हणून ते खोळंबले होते. लक्ष्मीच्या गुरासारखं ओरडण्याच्या आवाजागणिक अप्पांची काळजी वाढत चालली होती. आजूबाजूच्या बायका मदतीला होत्याच. मनु ही आलेली होती. अप्पासाहेबांची बहिण! शेजारच्या बाया कंटाळून निघून गेल्या होत्या. आत फक्त सुईण,मनु व लक्ष्मीच होत्या. संध्यासमयी बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि अप्पांचा जिव भांड्यात पडला. तरीही बाहेर आलेल्या सुईणीच्या तोंडावर काळजी दाटली होती. मागोमाग मनु ही बाहेर आली. बरेचसे पैसे व धान्य देत तीला काहीतरी दटवत होती. आता तिचा स्वभावच तसा होता हे माहित असल्याने अप्पांनी जास्त लक्ष दिले नाही. तरीही लक्ष्मी कशी असेल म्हणून ते न रहावून आत जाऊन आले. बाहेर आल्यावर त्यांच्याही कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मनुने डोळ्यानेच ईशारा करत अप्पांना शांत राहण्यास सांगितले. अप्पांचे आणखी होते तरी कोण? बाराव्या दिवशी नामकरण विधीसाठी यथासांग सर्व सोपस्कार मनुच पार पाडत होती.काही मोजकी खास आप्त बोलवले होते. कदम कुटुंबात हा तिसरा पाहुणा होता. मोठा मुकुंदा, त्यापाठची नयना बाळाशी खेळत होते. मलमली दुपट्टयात लपेटलेले ते गोरेपान बाळ, ईवले ईवले हात पाय,मोठ्या लोभस डोळयांनी टकामका इकडेतिकडे पाहत होते. ऐन विधीच्या आधी मनुआत्या व अप्पा वरच्या खोलीत काहीतरी गुढ वार्ता करताना मुकुंदाने पाहीले. माई चिंतेत दिसत होती. काहीवेळाने माईकडून बाळाला घेत मनुआत्या जमलेल्या मंडळी मध्ये आनंदाने सामील झाली. पाठोपाठ माई व अप्पाही आले. गोविंद घ्या बाई गोपाळ घ्या म्हणत मनुआत्याने कुर्रर्र करत बाळाचे नाव ठेवले ‘माधव’. मुकुंदाचे नावही मनुआत्यानेच ठेवले होते. मनुआत्या निस्सीम कृष्णभक्त होती. सर्व सुरळीत झाले असता नेमकं बाळानं शू केल्यानं माईची बहीण त्याचा दुपट्टा बदलण्यासाठी पुढे सरसावली. दुपट्टा खोलणार ईतक्यात मनुआत्याने फर्रकन बाळाला घेतले.

“पाहुण्यांनी पाहुण्यासारखं रहावं ” म्हणत घाऱ्या डोळयांचा जळजळीत कटाक्ष टाकला.

“आवं पर.. ” म्हणत मावशी रडतच परत निघाली. माई मागोमाग डबडबलेल्या डोळयांनी तीला थांबवत होती पण कुणीही थांबले नाही.

” जप गं माई लेकराला, ते घारे डोळे टपून बसलेत माधवावर. दोन्ही मुलीच तर आहे तिला. ”

” अक्के काहीबाही बोलू नको ,समदं कळतं मला ” माई ठामपणे बोलली.

” आस्सं, बघ तू, न्हाई ती माधवाला संगत घेऊन गेली तर काय.. ” म्हणत मावशी निघून गेली.

गतकाळातील घडलेल्या घटना झरझर अंथरूणाला खिळलेल्या माईच्या डोळ्यासमोर तरळत होत्या.

” मुकुंदा, म्या ईथेच मरणार रं सुखाने. मला न्यायचा आग्रह नको करूस बाळा .किती दिवस ऊरलेत रे माझे. १२ वरसाची होते मी, जवा तुझ्या अप्पांसोबत लग्न करून या घराचे माप वलांडले होते. ईथेच माझी ह्यात गेली रं. संसार झाला. तुझ्या अप्पांच्या आठवणी या घराच्या कोपर्‍यानंकोपर्यात रूजल्यात रं. तू , नयना, माधव…. ”

माधवाचे नाव घेताच माईच्या अश्रूंचा बांध फुटला. शब्द कंठातच गोठले व कृश शरीर थरथर कापू लागले. माईची अवस्था पाहून मुकुंदाचेही डोळे पाणावले.

” माई, अगं बरी होशील तू , काही होऊ देणार नाही मी तुला. डॉक्टर काकांना निरोप पाठवलाय. येतीलच ते ईतक्यात. ”

“माधव…….. ” माईच्या तोंडून ईतकेच अस्पष्ट ऊच्चार बाहेर पडत होते.

मुकुंद, मुकुंदाची बायको, मुले,मुली, नयना, जावईबापू ,नातू , मामा, मावशी सर्व नातलग मंडळी त्यांच्या जुन्या घरी जमा झाले होते. माईंची तब्येत नाजुक होती. माधवामध्ये माईचा जिव अडकला होता. अप्पांला जाऊन बरीच वर्षे झाली होती. तरी फक्त माईचा हट्ट म्हणून जागा कमी पडत असूनही मुकुंद माईच्या देखभालीसाठी परीवारासमवेत जुन्या घरीच थांबले होते. नविन फ्लॅट घेतला असतानासुद्धा ते तिथे राहण्यास अजून गेले नव्हते. यावरून त्यांची बायको व मुले नाराजीतच होते व सारखा त्यांच्या मागे ईथून जायचा धोशा लावत होते. माईंना सोबत नेण्यासाठी त्यांची काहीच हरकत नव्हती ऊलट आग्रहच होता. मात्र माई जुने घर सोडून जाण्यास राजी नव्हत्या. पर्यायाने मुकुंदानाही तिथेच थांबणे भाग होते.

“नयना, अगं माईला समजावून सांग तूच. मनुआत्या येईलच थोड्याच वेळात. माईने सारखा माधवच्या नावाचा जप लावलाय. ” मुकुंदा काळजी करत नयनाला बोलले.

” येऊदे की दादा, पूर्ण हयातीत कधी त्याचं नाव घेऊ दिलं नाही माईला. अप्पांनीही आणि आत्यानेही. आता आपण लहान राहीलो नाहीत. मिंधे नाही आपण कुणाचे. मनुआत्या जर आता काही बोलली ना मी तरी ऐकून घेणार नाही सांगून ठेवते आताच. ” नयना डोळे पुसत घोगर्या आवाजात बोलली.

“अगं धीराने घे पोरी, प्रसंग काय आहे ते तरी पहा. ” मावशी नयनाला समजावत बोलली.

” अगं पण माधवाला कुठे शोधायचं आता. किती वर्ष लोटली त्याला जाऊन. कुठे असतो, काय करतो कुणास ठाऊक? अप्पांच्या वेळी अचानक वेळेवर ऊगवला होता तो विधीच्या वेळी .कशी त्याला भनक लागली होती माहीत नाही. आताही असाच काहीसा चमत्कार घडो व तो येवो याशिवाय आपण काय करू शकतो? कुणाशी ब्र शब्द ही बोलला नव्हता तो त्यावेळी. त्याचा पत्ता कसा माहित करणार मग? ” मुकुंदाची काळजी क्षणा क्षणाला वाढत होती.

” बाबा, मनुआजी आली वाटतं. गाड्या आल्यात त्यांच्या “. मुकुंदाचा मोठा मुलगा बोलला. हे ऐकून मुकुंदा स्वतः त्यांना घेण्यासाठी बाहेर आले. ईतर सर्व आले होते पण मनुआत्या कुठे दिसत नव्हती.

” ताई, आत्या गं ? ” मुकुंदाने गाडीतून ऊतरत असलेल्या आत्याच्या मुलीला विचारले.

” अरे, आई येतेच आहे दुसर्‍या गाडीतून. आम्ही आधी आलो होतो. तुला माहितीये ना आईला प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही. म्हणून आम्ही काहीच विचारलं नाही. ”

“बरं, बरं.. या.. ”

तोपर्यंत डॉक्टर काकाही आले होते.

” मुकुंदा, आपण सर्व ऊपचार आधीच केलेत हाॅस्पिटलमध्येच. तुला कल्पना आहेच. इंजेक्शन दिलंय मी पण… ”

” माधवाला तेवढं बोलवं… ” डॉक्टर काका अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे होते. अप्पांचे खास मित्र होते. कदम कुंटुंबियांबरोबर कित्येक वर्षांचे ऋणाणुबंध होते त्यांचे. मुकुंदाची पाठ थोपटत ते निघून गेले.

आता मात्र मुकुंदाचा बांध तुटला. पन्नाशीतले मुकुंदा ओक्साबोक्शी लहान मुलासारखे रडू लागले. माई म्हणजे जिव की प्राण होती मुकुंदा साठी. अप्पा गेल्यानंतर माईनेच सर्वांना वाढवले होते. सर्वांना काय हवं नको ते पाहीलं होतं. गुरं, ढोरं, दुधदुभतं ते प्रसंगी शेतात राबण्यासही कधी कचरल्या नव्हत्या माई. मुकुंद सर्वात मोठा. त्यानंतर नयना व सर्वात धाकटा माधव. अप्पा श्रीमंत आसामी नसली तरीही गावात चांगला मान होता त्यांना. खुप मोठा वाडा जरी नसला तरी दुमजली जुन्या खणाचं घर होतं त्यांच. उदरनिर्वाह पुरती शेती व काही जनावरं. तरीही अगदी दृष्ट लागल असा अप्पा व माईंचा जोडा होता. धोतर, सदरा घालणारे अप्पा काळ्या मातीत राबून कणखर झाले होते. तर डोईभर पदर, नाकात मोठी नथ, खण, नऊवारी साडी, हातभर बांगड्या व कपाळी मोठ्ठं कुंकू व तितकाच मायाळू स्वभाव. चटणीभाकर जरी असली तरी घासातला घास वाटून खाण्याचा स्वभाव. असं जरी असलं तरी स्वाभिमानी व ईज्जत हीच दौलत ही शिकवण. मुकुंदा, नयना, माधवास काटकसरीने संसार करून शिक्षण दिले होते. याच मेहनतीने फळ म्हणून सर्व स्थिरस्थावर झाले होते व नयनालाही मोठ्या घरात थाटामाटात लग्न लावून दिले होते. सल एकच होती. माधव.

” धीर धर मुकुंदा, आरं समद्यात थोरला तू असं हार मानून कसं चालल? माईंनी तुझा आवाज ऐकला तर अजून तरास करून घेत्यानं. ” मामा मुकुंदास समजावत बोलले.

” कसं धीर धरू मामा, आता माधवाला कुठं शोधू मी ऽऽऽऽ कुठून आणून देऊ माईचा माधव बोल ना ऽऽऽ…मीच त्याला या हाताने बाहेर काढलं होतं घरातून. अप्पांपुढे काय चालणार होतं माझं? त्यानं कामच तस केलं होतं. त्याच्या चुकांवर पांघरूण तरी कसा घालणार होतो? ” टपटप टपटप टपोऱ्या अश्रूंच्या थेंबागणिक एक एक आठवण काढत मुकुंदा रडत होते.

“आरं, पर ह्यात तुझी कायबी चूक न्हाई बघ. दाजींचा फैसला होता माधवाला घराभाईर काढायचा. त्यात तू मनाला लावून घेऊ नगं ” मामा मुकुंदाला बोलले.

पूर्ण प्रकरण कुणालाच ठाऊक नव्हते. अगदी मुकुंदाच्या बायकोलाही नाही. हीच सल मुकुंदाला आतून पोखरून काढत होती. शेतीच्या पैशात फेरफार केल्यानं अप्पांनी माधवाला घराबाहेर काढलं हेच कारण सर्वांना माहीत होते. मात्र अप्पा, माई व मुकुंदालाच नेमकं माधवाला घराबाहेर का काढले हे माहित होते. अप्पा कधीच काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यांच्यासोबत त्यांना ते माहीत असलेले कारणही लुप्त झाले होते. तर माईची अवस्था ही अशी. माईंच्या त्याला अशा आठवण्याने आज ईतकी वर्षे लोटून भरलेली ती जखम पुन्हा भळभळती झाली होती. माईची ईतकी क्षुल्लक ईच्छा ही आपण पूर्ण करू शकत नाही याचे दुःख मुकुंदाला जास्त होत होते. कुठून आणून देणार माईचा माधव? कुठे शोधायचं आता त्यास ? ज्यास भर्यापुर्या घरातून हात पकडून बाहेर काढले, तो कुठे जाईल? कुठे राहील? कशाचीही पर्वा न करता ईतकी वर्षे त्यास जाणूनबुजून विस्मृतीत ठेवले, आज त्याची निकड भासताच तो आठवला? वाह..!! मुकुंदाच मनोमन चाललेलं द्वंद्व अधिकाधिक कर्कश होत होतं.

आतल्या खोलीतून रडारडचा आवाज कानी पडताच मुकुंदाच्या काळजात धस्स झालं. पटापट सर्व पुरूष मंडळी आत धावली. मुकुंदाने जोरात टाहो फोडला. सर्वजण ते पाहून गहिवरले . सर्व जण असूनसुद्धा माईचे अर्धोन्मिलित थकलेले डोळे सर्व प्राण एकवटून माधवची वाट पाहत होते. अखेरची घटका मोजत असतानाही शेवटचं माधवंला पाहण्यासाठी माई तगून होत्या.

” मुकुंदा…. म…. नु… ” अगदीच अस्पष्ट असे शब्द माई बोलत होत्या.

इतकावेळ माधवाची आठवण काढणारी माई अचानक मनुआत्या चं नाव घेताना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

” मामी, आई निघाली होती आमच्यासोबतच पण अजून कशी आली नाही, येईलच. मी फोन करते ड्रायव्हर ला. ” मनुआत्याची मुलगी माईंना समजावत बोलली.

अगदी बालपणी माधवाच्या बारस्याच्या वेळी अप्पांना वेगळ्या खोलीत घेऊन जाणारी व काहीतरी गुढ वार्ता करणारी, माधवाची सावली बनून वावरणारी, अगदी मावशीला क्षुल्लक माधवाचा दुपट्टा बदलण्यासही मनाई करणारी व पाहुण्यांनी पाहुण्यासारखं रहावं असं बजावणारी, सतत माई वर अघोषित सत्ता गाजवणारी, ती आल्यावर माईला रडण्याची मुभा ही न देणारी, घरातल्या प्रत्येक प्रसंगात पुढे असणारी, पैसेवाल्या सासरचा तोरा मिरवणारी, सोन्याच्या बांगड्या घालणारी,रेशमी शेला पांघरणारी, अगदी गरजेपुरतं बोलणारी व जास्तकरून डोळ्यांच्या ईशार्यातच बोलणारी अप्पांची सर्वात लाडकी व विश्वासू, तिच्याशिवाय घरातले पानही हलू न देणारी, माईला सर्व अधिकार असले तरी मनुआत्या आल्यावर आपसूकच माईला दटवून ठेवणारी , काहीशी गुढ दगडी घारे डोळे असणारी अशी ही ‘मनुआत्या’ माईला शेवटच्या क्षणी का आठवली असावी असा प्रश्न मुकुंदासहीत ईतर जणांना ही पडला.

” मनुआजी आली….. ” या आवाजाने मुकुंदांची तंद्री भंगली व ते पटकन उठून बाहेर आले. ईतरही सर्व जण त्यांच्यासाठी पटापट ऊठून ऊभे राहीले.

शरीर थकले असले तरी तेच करारी, दगडी घारे डोळे, तीच चाल, तोच पेहराव व तसाच दरारा वागवत मनुआत्या कारमधून खाली ऊतरत होत्या. त्यांना आधार देण्यासाठी मुकुंदा पुढे झाले. खाली ऊतरताच त्यांचा चरणस्पर्श घेतला. मुकुंदाला हुंदका दाटून आला. डोक्यावर हात फिरवत मनुआत्याने मुकुंदाची गळाभेट घेतली. क्षणभर आपल्या भावास ‘अप्पाला’भेटल्याचा भास त्यांना झाला व त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

” वहीनी कशीये मुकुंदा? ”

“सारखा माधवच्या नावाचा जप लावलाय… ” मुकुंदाचे शब्द पुरे होण्याच्या आत माधवही त्याच कारमधून खाली ऊतरताना पाहून आनंद,आश्चर्याचे,पश्चातापचे भरते मुकुंदांला आले. नेहमीच्या सवयीनं आत्यानं डोळ्यानेच ईशारा करत आत चलण्यास सांगितले.

माईला पाहून टप टप मनुआत्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते.

“पहा कशी मगरीचे अश्रू ढाळतीये.. ” बायकांमध्ये खुसपूस आवाजात चर्चा सुरू झाली.

“मा……. ध………….. ” माईंना आता शब्द ही फुटत नव्हते. आवाज धुसर झाला होता. कुणाला काहीच कळेना की, माई आत्याला माधवाचे का विचारत आहे?

मनुआत्याने पुढे होऊन चमचाभर गंगाजल माईला पाजले व मुकुंदाला माधवास आत आणण्याचा ईशारा केला. मुकुंदाने माधवास आत आणताच त्यास पाहून फक्त माईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.त्यास डोळे भरून पाहत व त्याच्या तोंडावरून हात फिरवत माईने माधवला कवटाळले. उपस्थित सर्वांना भावनावेग अनावर झाला. माधव माईच्या दोन्ही पायावर डोकं ठेवून रडू लागला. माईने मनुआत्या कडे पाहून फक्त हात जोडले व प्राण सोडला. पुढील सर्व सोपस्कार, अंत्यविधी झाले.

सर्व व्यवस्थितरित्या पार पडले असले तरी व माईची अखेरची माधवाला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली असली तरी माधव अचानक आला कसा? कुणाबरोबर आला? मनुआत्याच्या पाठोपाठच कसा आला? माईने मनुआत्याची आठवण शेवटच्या क्षणी का काढली? माईने मनुआत्या कडे पाहून हात का जोडले? ते ही आयुष्यभर माईचा ईतका छळ मांडला असताना? असे कित्येक प्रश्न जमलेल्या सर्वच आप्तांना पडले होते. पण मनुआत्या समोर हे प्रश्न विचारण्याची बिशाद कुणाचीच नव्हती. माधवाला मनुआत्या सोबत कारमध्ये आलेला मुकुंदाशिवाय कुणीच पाहीलं नव्हतं. या प्रश्नांची उत्तरे मामा, मावशी सहीत नयनालाही हवी होती. मुकुंदाला ते सर्व आत्याला विचार म्हणून भाग पाडत होते पण मुकुंदा अगदी शांत व खोल पाण्यात तळाशी बुडल्यागत शांत बसून होते. त्यांना अशा सत्याचा ऊलगडा झाला होता की जे सत्य माई, अप्पा, मनुआत्या नंतर मुकुंदाला आज कळालं होतं. एक असं गुपित जे या तिघांनी आयुष्यभर जपलं होतं व ते मुकुंदालाही मरणापर्यंत जपावं लागणार होतं. काय होतं ते सत्य? अगदी माधवाला घराबाहेर काढतानाही याची कल्पना कशी आली नाही याचं मुकुंदांना स्वतःचंच नवल वाटत होतं.

” दादा तू विचार तरी… ”

“मी कुणालाही काहीही विचारणार नाही आणि कुणी विचारायचा प्रयत्न केला तरी मी त्यास तसं करू देणार नाही. बास. यापुढे एक शब्दही नको. ” म्हणत मुकुंदा आत ऊठून गेले.

तिसर्‍या दिवशी मनुआत्या जाण्यास निघाली. माधवं त्याच दिवशी निघून गेला होता. मुकुंदा व मनुआत्या मध्ये मूक संवाद चालला होता. मुकुंदाच्या डोळ्यातून अश्रू पडत होते व मनुआत्याचा हात हातात घेऊन घट्ट पकडला होता. आज मनुआत्याची मुकुंदाच्या नजरेत ऊंची कितीतरी पटीने वाढली होती. या घरासाठी तिने काय केले हे कुणासही कळणार नव्हते. ऊलट कितीतरी लांछन तीने आपल्या स्वतःवर घेऊनही धीरोदात्त पणे ती ऊभी होती. परत एकदा मनुआत्याच्या पायावर मुकुंदा वाकला व चरणावर अश्रूंचा अभिषेक पडला. तिनेही त्याची पाठ थोपटत डोळ्यानेच विश्वास देत गाडीत बसून निघून गेली.

तिच्या गेलेल्या गाडीकडे पहात कितीतरी वेळ मुकुंदा तिथेच ऊभे राहीले. घडलेल्या घटना अगदी बालपणापासून ते आतापर्यंत सरसर सरकू लागल्या. सर्वांसमोर वाईट असणारी मनुआत्याने या घरासाठी जे केलं होतं ते ही कुणासही खबर लागू न देता ते खुप मोठा ऊपकार होता ज्याची ऊतराई होण्यासारखी नव्हती.

” काढ मुकुंदा, या हरामखोराला काढ घरातून बाहेर.. नाहीतर मी याला जिता सोडणार न्हाई.. ” आप्पा संतापाने लालबुंद झाले होते.

” पर आप्पा… ”

” तू काढतोय का मी काढू? ”

मुकुंदाने माधवास हाताला धरत बाहेर काढले. माधवं कुठल्यातरी नाटकात स्री भुमिका करतोय व ते कळल्यामुळे ते त्यास बाहेर काढताहेत ईतकीच माहिती मुकुंदाला होती. माधवच्या पायात आताही पैंजण वाजत होते. नक्कीच अप्पांनी याला स्री वेशात पाहीले असणार. म्हणूनच ईतके रागावले असणार. नंतर नक्कीच आपण त्यास परत आणू अप्पांचा राग शांत झाल्यावर असं विचार करून मुकुंदा शांत होते. याआधी ही एकदोनदा माधवास स्रीवेशात पाहून मुकुंदा हैराण झाले होते. मात्र माई बोलली की तो नाटकात भुमिका करतोय म्हणून काही वाटले नव्हते. त्याचा असा परीणाम होईल याचा विचारही कुणी केला नव्हता. मात्र माधवास बाहेर काढताना नेमकं काही बोलता आलं नाही याची खंतही होती. माईंचही काही ऐकून घेण्यास अप्पा तयार नव्हते. माई रडून विनवत होती. ईतर कोणी घरात नव्हतं. त्यामुळे आत काय घडतयं हे कुणासही माहीत नव्हतं.

” याद राख मुकुंदा, या खोलीत काय घडलयं हे कुणाला समजता कामा नये.कुणी जर विचारलच तर शेतीच्या पैशात फेरफार केली असं सांग. ”

“पर आप्पा, ऐकून तरी घ्या.. ”

” मला काहीही ऐकून घ्यायचं न्हाई. खबरदार जर पुन्हा या घरात त्याचं नाव काढाल तर.. ”

” व्हय अप्पा .”

अगदी कालपरवा घडल्यासारखा पूर्ण प्रसंग मुकुंदाला आठवला. व आता गाडीतून ऊतरतानाचे माधवचे पाय ही आठवले !! होय, भरगच्च पैंजण! जे गडबडीत तो काढण्याचे विसरला होता. जे आत येण्यापूर्वी त्याने ते काढून ठेवले होते. अप्पांच्या वेळी अचानक वेळेवर ऊगवणारा माधव केवळ मनुआत्या मुळेच येऊ शकला होता जसं तो आता आला होता. म्हणून तर माईने नेमकी मनुआत्याची आठवण शेवटच्या क्षणी काढली होती. म्हणजे माईला सर्व ठावूक होतं की माधवचा सांभाळ मनुआत्या करत आहे. मावशीला माधवचा दुपट्टा बदलू न देणारी मनुआत्या, बारश्याच्या दिवशी गुढ वार्ता करणारी मनुआत्या का असं करत होती याचा ऊलगडा त्या माधवच्या पायातल्या पैंजणाने केला होता. एक एक घटना जोडत पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत होतं. प्रत्येक घटनेत मनुआत्या सावलीसारखी माधवाच्या मागे होती. अप्पाशी काय गुढ वार्ता करत होती? दुपट्टा बदलण्यासाठी मावशीला तीने का रोखले होते? ईतर भावंडाप्रमाणे माईला माधवापासून का विलग केले होते? माई कणखर स्री असूनही मनुआत्याला तिची मूक संमती का होती?माधवाची आंघोळ ही कुणाला दिसू नये याची खबरदारी का घेतली जायची? याचं उत्तर त्या माधवाच्या पायात गडबडीने राहीलेल्या पैंजणांनी कधीच दिला होता. माधवं किन्नर होता!! अर्धनारीनटेश्वर!! शिवाचं असं रूप जे या समाजात सहजी स्विकारलं जात नाही. अशा बालकास किन्नरांना सोपवून मोकळे होतात लोक व आपल्या घराण्याच्या कलंकास धूवून टाकतात. अप्पाही बहुतेक तेच करणार होते जे मनुआत्याने करू दिले नाही. माधवाची सावली बनून व माईला माधवापासून तुटकच ठेऊन व प्रसंगी सर्व लांछन आपल्यावर घेऊन मनुआत्या राहत होती. आईची माया नकळत या गुपिताला कुठे ऊघड करु नये यासाठी माईला सतत मनुआत्याने दटवत ठेवले. त्याच माईची अखेरची ईच्छा मनुआत्यानेच पुरी केली व माधव केवळ तुझाच आहे याचा प्रत्यय ही आणून दिला. केवळ याचमुळे माईने मनुआत्या ला हात जोडले. सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी लख्ख सुर्यप्रकाशाप्रमाणे चमकत होती. सर्व अंधकार हटून सत्याच्या लख्ख प्रकाशात मनुआत्याचं व्यक्तित्व चमकत होतं. तरीही अप्पा, माई प्रमाणेच आपल्यासोबतच हे ‘गुपित’ विरलं जाईल हे मुकुंदाने मनोमन ठरवलं. मुकुंदांचा ह्रदय समाधानाने भरून आले होते.

समाप्त.

आपलाच समीर खान.

Leave a comment